![]() |
सुळेंची अजित पवार गटाला थेट इशारा |
सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधील सभेत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना खणखणीत भाषेत इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली आहे. लोकशाही नाही, तर दडपशाही पद्धतीने राजकारण चालू आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या ज्या व्यक्तीने आयुष्य राजकारणामध्ये घालवले, त्या माणसाला धमकी देणे हे दुर्दैवी आहे. यापूर्वी असे राजकारण कधीच झाले नव्हते. गृहमंत्री असतानाही भीती राहिली नाही. हर्षवर्धन पाटील हे सन्मानीय व्यक्ती असून बारामती मतदारसंघात कुणालाही धमकी दिली तर तो प्रकार सहन करून घेतला जाणार नाही. अदृश्य शक्तीने महाराष्ट्रामधील राजकारणाला दृष्ट लावली आहे. आम्ही सर्व एकत्र असताना कुणी देखील कुणाला धमकी दिली नाही. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच मी धमकी दिल्याचा प्रकार ऐकत आहे. तर मी बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी आहे. त्यामुळे येथील मतदारसंघातील लोकांची जबाबदारी माझी आहे, आणि माझ्या मतदारसंघात कुणाला देखील धमक्या दिल्या जात असतील तर सुप्रिया सुळे ताकदीने उतरल्या शिवाय राहणार नाही, असे त्या म्हणाल्या आहे.
लग्नाच्या मंडपात सुळे आणि हर्षवर्धन पाटलांची भेट
काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील नातेपुतेमधील एका लग्न समारंभात हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती. त्यादरम्यान या दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या होत्या. सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीमुळे बारामती मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.