![]() |
आज वंचितसोबत मविआची सकारात्मक बैठक |
मुंबई - देशात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाश्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपासाठी चर्चा चालू असून त्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहे. तर या सगळ्यात महाविकास आघाडी (MVA) आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) युती होणार की नाही, यावर सर्व राजकीय वर्तुळातील मंडळींचे लक्ष लागून आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचितने लोकसभेच्या २७ जागांवर तयारी केल्याचे वक्तव्य केल्यानंतर मविआ आणि वंचितची युती जवळजवळ फिस्कटल्याची चर्चा होती. प्रकाश आंबेडकर यांनी देखील वंचितच्या नेत्यांना मविआच्या कोणत्याही व्यासपीठावर जाऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी स्वबळावर पुन्हा एकदा लोकसभेच्या (Loksabha Election 2024) रिंगणात उतरतील अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी मुंबईतील फोर रिझन्स हॉटेल्समध्ये झालेल्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावल्याने मविआ आणि वंचितच्या युतीच्या आशा पुन्हा एकदा पटरीवर आल्या आहेत. त्या बैठकीमधून प्रकाश आंबेडकर बाहेर पडल्यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
प्रकाश आंबेडकर हे बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी घेरले. बैठकीमध्ये जागावाटपा बद्दल काय ठरले, असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आता मी काही देखील बोलणार नाही. तुम्हाला नंतर ब्रिफिंग होईल. त्यानंतर आंबेडकर यांना तुम्ही मविआसोबत एकत्र लढणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेडकर म्हणाले की, मी अजूनही कशात नाही. पुढच्या बैठकीमध्ये सगळं ठरेल. तरी देखील पत्रकारांनी तुम्ही बैठकीबद्दल समाधानी आहात का ? असा प्रश्न आंबेडकरांना विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून काय वाटते ? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी हसत-हसत काढता पाय घेतला.
आंबेडकर आणि आमचे एका गोष्टीवर एकमत झाले
मविआ जागावाटपाच्या आजच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर हे प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला की नाही. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. परंतु , चार पक्षांत समाधानी अशी चर्चा झाली, ४८ जागांसाठी चर्चा झाली आणि ती सकारात्मक अशी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात कोणत्याही जागांवरून मतभेद नाही. एकाही जागेवरून मतभेद नाही. आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे. त्याच्यावर देखील चर्चा झाली आहे. आमची सर्वांची इच्छा आहे की, वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असावी. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून निवडणूकीला सामोरे जावे हेच ठरले आहे, असे संजय राऊत म्हणाले आहे.